मानिवली (शी )बोगस घरपट्टी प्रकरणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आण्णा साळवे यांची तक्रार दाखल.
मुरबाड प्रतिनिधी - तालुक्यातील मौजे मानिवली (शी) गावात बोगस घरपट्टी दाखवून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच,काही लाभार्थी आणि MIDC अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा करण्यात आला असून, यात गावातील तीन जणांनी एका घराचे दहा बारा घरे करून कुटूंबातील अनेक नावे दाखवून शासनाचा निधी, जमीन, नोकऱ्या लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.यासंदर्भात तक्रारदार आण्णा मोतीराम साळवे यांनी पोलीस निरीक्षक, मुरबाड पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची तसेच फेर मोजणी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी केली आहे.
तक्रारदार आण्णा साळवे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात MIDCचे काही अधिकारी व ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एकाच घराच्या अनेक बोगस घरपट्टया दाखवून. त्यातून MIDC कडून वाढीव मूल्यांकन करून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला.
यापूर्वी देखील गटविकास अधिकारी मुरबाड, पंचायत समिती व जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे देखील या घोटाळ्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट ग्रामपंचायतने मासिक सभेत ठराव करून बोगस घरपट्टी रद्द करता येणार नसल्याचे जाहीर केले आहे. माहिती अधिकारात देखील अपूर्ण माहिती देऊन ग्रामसेवकांनी गैरप्रकार झाकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अण्णा साळवे यांनी केला आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, आता या गैरव्यवहारातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु असून काही लाभार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी अस्तित्वात असणारी घरे पाडून पुरावे मिटवण्याच्या तयारीत असल्याचे तक्रारदार साळवे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रकारामुळे शासनाच्या निधी चा मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाला असून यामध्ये संबंधित लाभार्थी, तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच व MIDCचे अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्वरित चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष आण्णा साळवे यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments