मिल्हे गावचा तारा चमकला – सतीश घावट यांना राज्य सरकारचा सावित्रीबाई फुले गुणगौरव पुरस्कार प्रदान.
मुरबाड प्रतिनिधी - अण्णा साळवे
मुरबाड तालुक्यातील मिल्हे गावचे सुपुत्र व रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील (झुगेरवाडी) गावच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक सतीश नारायण घावट यांना यंदाचा महाराष्ट्र शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार” महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गावभर आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
घावट सरांच्या रक्तातच शिक्षणाची परंपरा आहे. त्यांचे वडील नारायण तुकाराम घावट हे स्वतः शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर त्यांचा भाऊदेखील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो. या शैक्षणिक वातावरणामुळेच सतीश घावट यांच्यात लहानपणापासून शिक्षणाची गोडी आणि समाजसेवेची वृत्ती निर्माण झाली.
विद्यार्थीदशेतच ते हुशार व मेहनती होते. इयत्ता बारावीमध्ये त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्णता मिळवली आणि डी.एड. प्रवेशासाठी पहिल्याच यादीत नाव लागले. त्यावेळीच गावकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता.
सध्या ते झुगेरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये चमकले आहेत. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी राज्यस्तरावर प्रतिनिधित्व केले. कोरोनाच्या काळातही त्यांनी थांबून न बसता शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सहभाग घेतला.
त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला. तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त आणि नाविन्यपूर्ण शिक्षण दिले.
या सर्व कार्याचा परिपाक म्हणून राज्य सरकारने त्यांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आला.हा सन्मान मिळाल्याने केवळ घावट कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण मिल्हे गावाचा,मुरबाड, कर्जत तालुक्याचा आणि ठाणे,रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
Post a Comment
0 Comments