जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत देवगाव जिल्हा परिषद शाळेची हॅट्रिक कामगिरी
मुरबाड : आण्णा साळवे
जिल्हा परिषद शाळा देवगाव हिने जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय हॅट्रिक नोंदवली आहे. ठाणे जिल्हा परिषद आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये देवगाव शाळेने सातत्यपूर्ण यश मिळवत जिल्ह्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.
यंदाच्या स्पर्धेत अंध मुलीच्या जीवनावर आधारित “संघर्ष” हे नाटक सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांचा अभिनय व्यावसायिक कलाकारांनाही लाजवेल असा प्रभावी होता. झोपडीचा समर्पक देखावा, प्रकाशयोजना, संगीत व रंगभूषेमुळे नाटक विशेष उठून दिसले.
नाटकाची निर्मिती मुख्याध्यापिका दीपश्री ईसामे यांनी केली. रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी श्रद्धा चौधरी आणि रघुनाथ विशे यांनी सांभाळली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक बाबींमध्ये सहकार्य केले.
सदर नाटकाचे लेखन व दिग्दर्शन एकनाथ देसले यांनी केले असून ते शहीद भाई कोतवाल या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक म्हणूनही परिचित आहेत. नाटकातील कलाकार चिन्मय भांडे, रुद्र बांगर, सृष्टी तुपे, संस्कृती तुपे, दुर्वा बोटकुंडले आणि प्रिन्स खंडागळे यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला.
सलग तिसऱ्या वर्षी मिळालेल्या या यशामुळे विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गावात फटाके वाजवून, औक्षण करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांत देवगाव शाळा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही अग्रेसर ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.
Post a Comment
0 Comments