“हर हर महादेवच्या जयघोषात चाफे गाव दुमदुमणार; शिवशक्ती मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने भक्तीचा महासागर उसळणार”
मुरबाड (प्रतिनिधी आण्णा साळवे )
: मुरबाड तालुक्यातील मु. चाफे (धसई), जि. ठाणे येथे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक असा शिवशक्ती मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा दिनांक १५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी श्री मठ बाघम्बरी गद्दीचे पीठाधीश्वर श्री १०८ महंत श्री बलवीर गिरीजी महाराज (प्रयागराज) यांचे पावन सान्निध्य लाभणार आहे. त्यांच्या हस्ते मंदिरातील शिवशक्ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन विधी संपन्न होणार असल्याने हा सोहळा गावासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी १५ मार्च रोजी सकाळी ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येणार असून गणपती मंदिर ते चाफे गावापर्यंत भक्तीमय वातावरणात मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर गणपती पूजन, गंगा पूजा, गोपूजा, महागणपती हवन, श्रीसूक्त हवन, पंचमंत्र हवन, वास्तुशुद्धी, दुर्गा हवन अशा विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत.
१६ मार्च रोजी बिंब अधिवास, अथर्वशीर्ष हवन, दक्षिणामूर्ती हवन, वनदुर्गा हवन आदी विधी होणार असून मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य तयारीचे कार्यक्रम पार पडतील.
तर १७ मार्च रोजी श्री रुद्र हवन, पंचदुर्गा हवन, कालरात्रि अभिषेक, महापूजा आणि शिवशक्ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावात करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्यानिमित्त सामुदायिक हरिपाठ, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज राऊत यांचे कीर्तन तसेच नामवंत गायक-वादकांच्या भजनांनी भक्तीचा रंग अधिकच खुलणार आहे. तसेच अखिल भारतीय नाथ संप्रदायाचे पिरजी बालयोगी श्री गणेशनाथ बाबा (त्र्यंबकेश्वर) यांच्यासह विविध मठांचे संत-महंत उपस्थित राहून भाविकांना आशीर्वाद देणार आहेत.
हा भव्य सोहळा समस्त घोलप परिवार व शिवशक्ती मित्रमंडळ चाफे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून चाफे, धसई, भुईपाडा, दहीगाव, किरपणपाडा आणि शिरवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने या सोहळ्याच्या तयारीत सहभागी झाले आहेत.
शिवशक्तीच्या या पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.“भक्ती, श्रद्धा आणि ग्रामएकतेचा संगम असलेला हा सोहळा चाफे गावासाठी आध्यात्मिक पर्व ठरणार आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment
0 Comments