मुरबाड – संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाची रंगत यंदा मुरबाड तालुक्यातही पाहायला मिळाली. शहरापासून माळशेज घाटापर्यंत, धसई, सरळगाव, टोकावडेसह तालुक्यातील सर्व भागांमध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचा जल्लोष अनुभवता आला.
धसई येथे पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि तारपा नृत्याच्या तालावर भव्य रॅली काढण्यात आली. धसई सोसायटी येथून निघालेली ही रॅली धसई चौकात एकत्र जमून उत्स्फूर्त नृत्य, गाणी आणि कलाविष्कारांनी रंगली. महिला, युवक आणि लहान मुलांचा मोठा सहभाग यावेळी पाहायला मिळाला.
गायकर हॉल येथे झालेल्या विशेष बैठकीत आदिवासी नृत्य, गाणी आणि पारंपरिक कलांचे मनमोहक सादरीकरण झाले. या प्रसंगी आमदार किसन कथोरे आणि तहसीलदार अभिजित देशमुख यांनीही नृत्यात सहभागी होत उपस्थितांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुरबाड तालुका आदिवासी संघटनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार संधी, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि पारंपरिक जमिनींचे संरक्षण यांसह अद्याप न सुटलेल्या अनेक प्रश्नांवर शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
आ. किसन कथोरे यांनी आश्वासन दिले की, "तालुक्यातील कोणताही आदिवासी बांधव शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही. त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध आहे."
यावेळी आमदार किसन कथोरे, तहसीलदार अभिजित देशमुख, मुरबाड तालुका आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध सांस्कृतिक मंडळांचे प्रमुख, महिला मंडळ आणि हजारो आदिवासी बांधव उत्साहाने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments