मुरबाड तालुक्यातील सहा हजार लाडक्या बहिणी अपात्र; महिलांमध्ये संतापाची लाट
मुरबाड (प्रतिनिधी) – राज्य सरकारच्या "लाडकी बहिण" योजनेअंतर्गत आर्थिक लाभाची अपेक्षा बाळगणाऱ्या मुरबाड तालुक्यातील तब्बल सहा हजार महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर महिलांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील विविध गावांमधून सुमारे २६ हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी जवळपास ६ हजार अर्ज विविध कारणास्तव फेटाळण्यात आले आहेत. अपात्रतेची प्रमुख कारणे म्हणजे दस्तऐवजांतील त्रुटी, उत्पन्न मर्यादा ओलांडणे, आधार व बँक खात्याची लिंकिंग समस्या, तसेच चुकीची माहिती सादर करणे.
अनेक लाभार्थी महिलांचे म्हणणे आहे की, स्थानिक प्रशासनाने अर्ज तपासणी प्रक्रियेत पुरेशी पारदर्शकता ठेवली नाही. अनेक ठिकाणी पात्र महिलांनाही कोणतीही स्पष्ट कारणे न देता अपात्र करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही ठिकाणी अर्जदारांना दुरुस्ती करण्याची संधी न देता थेट फेटाळणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सदर प्रकरणी महिलांनी ग्रामपंचायत, तालुका प्रशासन तसेच आदिवासी विकास विभागाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच मोठ्या प्रमाणावर मोर्चा व आंदोलने करण्याचा इशारा स्थानिक महिला गटांनी दिला आहे.
दरम्यान, तालुका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सर्व अपात्र अर्जांचा पुनर्विचार करण्यात येईल आणि खरी पात्रता असलेल्या महिलांना न्याय मिळेल. मात्र तोपर्यंत हजारो लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आणि संताप वाढतच चालला आहे.
Post a Comment
0 Comments