शहापूर (प्रतिनिधी) – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर अंतर्गत २०२३–२४ आणि २०२४–२५ या काळात शासकीय निधीच्या वापरात गंभीर अपारदर्शकता, अनियमितता आणि सरळसरळ भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सामाजिक कार्यकर्ते अण्णा मोतीराम साळवे यांनी कारवाई व चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत जर प्रकल्प अधिकारी यांनी दखल घेतली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
.
साळवे यांनी तक्रारीत स्पष्ट केलं आहे की, मार्च २०२४ मध्ये प्रकल्पातील अनेक शासकीय आश्रमशाळांमध्ये जनरेटर दुरुस्ती, वॉटर हिटर, संडास टाकी सफाई, जंतुनाशक फवारणी, पाण्याचे फिल्टर आदी कामे प्रत्यक्षात न करता खोट्या बिलांवर लाखो रुपये उचलण्यात आले. अनेक शाळांतील मुख्याध्यापकांवर ५०% कमिशनसाठी दबाव टाकण्यात आला असून, विरोध करणाऱ्यांवर मानसिक दबाव आणला जात आहे.
जिल्हा नियोजन निधी व क्रीडा स्पर्धांचे बजेट यामधूनही बनावट खर्च दाखवून निधीची लूट सुरू असून, स्वतःच्या नातलग ठेकेदारांना कामे देऊन पैशांचे उघड उघड वाटप केल्याचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सामान्य कर्मचारी, शिक्षक यांच्यावर कामासाठी पैसे उकळले जात असून, त्यांच्या बिलांना दुय्यम स्थान दिले जात आहे. याबाबत अण्णा साळवे म्हणतात, "ही बाब केवळ आर्थिक भ्रष्टाचारापुरती मर्यादित नाही, तर ती आदिवासी विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे हक्क लुटणारी आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ चौकशी झाली पाहिजे, अन्यथा सचिव, आयुक्त आणि आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे तक्रार, तसेच न्यायालयीन लढाई छेडण्यात येईल."
प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी मौन बाळगले असले तरी, अण्णा साळवे यांच्या या बेधडक कारवाईमुळे प्रकल्प प्रशासन हादरले आहे. आता शासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर याबाबत प्रकल्प अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही तर यां भ्रष्ट कारभाराबाबत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
Post a Comment
0 Comments