मुरबाडमध्ये ४ सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाचे तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण
मुरबाड (प्रतिनिधी) –अण्णा साळवे
मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून मराठा समाजाचे जोरदार उपोषण सुरू असून, ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची अवास्तव मागणी केली जात आहे. या अन्यायकारक मागणीमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती असून, या विरोधात आता ओबीसी समाजही आक्रमक भूमिका घेत आहे.
ठाणे जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांच्या वतीने मुरबाड तहसील कार्यालयासमोर ४ सप्टेंबर २०२५ रोजी साखळी उपोषण व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.
आंदोलनाच्या तयारीसाठी तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातील घटकांच्या प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक १ सप्टेंबर रोजी कुणबी भवन, मुरबाड येथे झाली. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा, उपोषणासाठी लागणारी व्यवस्था आणि प्रशासनाशी संपर्क यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार आजच तहसीलदार कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.
ओबीसी समाजाच्या सर्व संघटनांचे प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या नियोजित आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी तालुका कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष गणपत विशे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, ओबीसी उपोषणकर्ते शंकर वडवले, सोपान गोल्हे, नितीन राणे, श्री. जाधव, तसेच पत्रकार श्याम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments