अवकाळी पावसाने ठाणे व कोकणातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; आमदार किसन कथोरे यांनी कृषीमंत्र्यांकडे तातडीने पंचनामे व नुकसानभरपाईची केली मागणी.
मुरबाड प्रतिनिधी आण्णा साळवे
ठाणे जिल्हा तसेच संपूर्ण कोकण परिसरात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले भात पिक पूर्णपणे भिजून नष्ट झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर मुरबाडचे आमदार मा. किसनजी कथोरे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा. दत्तात्रय भरणे साहेब यांना तातडीचे पत्र पाठवून ठाणे जिल्ह्यासह कोकण परिसरातील सर्व प्रभावित भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
आमदार कथोरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 19 ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ठाणे व कोकण परिसरात झालेल्या मुसळधार अवकाळी व परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी अतिशय मेहनतीने पिकविलेल्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कापणी केलेले पिक शेतात सुकवण्यासाठी ठेवले होते तर काहींचे कापणीसाठी तयार होते, परंतु मुसळधार पावसाने हे सर्व पिक भिजवून टाकले. परिणामी शेतकरी वर्ग पूर्णतः हतबल झाला असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाबाबत मोठ्या चिंतेत आहे.
आमदार किसन कथोरे म्हणाले की, यापूर्वीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता आणि आता परतीच्या पावसाने उरलेसुरलेही हिरावून घेतल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. अशा स्थितीत जगाचा पोसिंदा असलेला बळीराजा अत्यंत तणावात असून त्याला तातडीने मदतीची गरज आहे.
त्यामुळे आमदार किसन कथोरे यांनी कृषीमंत्र्यांकडे ठाणे जिल्हा व कोकण परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आणि शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले की प्रशासनाने त्वरीत कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही काळाची गरज आहे.
या पत्राची प्रत जिल्हाधिकारी ठाणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेतल्याने ठाणे व कोकण विभागातील शेतकरी वर्गात दिलासा व आशेची भावना निर्माण झाली आहे.
Post a Comment
0 Comments