सुभाषदादाच्या भाजप प्रवेशाची मोठी चर्चा : पुढे सत्तासमीकरणाचे काय होणार..?
मुरबाड (प्रतिनिधी) :आण्णा साळवे
मुरबाड - गेल्या काही दिवसांपासून मुरबाडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते , शिवसेना शिंदे गटात असताना ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषदादा पवार लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मात्र, त्यांच्या प्रवेशाच्या अटी आणि त्या मागील राजकीय समीकरणांमुळे मुरबाडच्या राजकारणात मोठा गोंधळ आणि चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. असे सांगितले जात आहे की सुभाष पवार यांनी भाजपात प्रवेश करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची अट घातली आहे. ही बाब अनेकांना खटकणारी ठरली असून, “भाजपाला एवढी काय गरज लागली सुभाष पवारांची?” असा सवाल जनतेतून पुढे येताना दिसतो आहे.
ज्यांनी एकेकाळी भाजपाचे आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांनाच आज भाजपात स्थान देण्याची तयारी का? — हा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना आणि मतदारांना चटका लावणारा ठरला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने घेतलेले हे पाऊल म्हणजे सुभाष पवार यांना राजकीयदृष्ट्या जवळ घेण्याचा प्रयत्न की त्यांना राजकीयरीत्या निष्प्रभ करण्याचा डाव? हे लवकरच स्पष्ट होईल.
भाजप हा देशातील आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष मानला जातो; परंतु मुरबाडमधील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला सोबत घेऊन पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास कसा टिकवला जाईल, हा मोठा प्रश्न आहे. काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुभाष पवार यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला असून, “आमच्या पदाचे, आमच्या अस्तित्वाचे काय?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचवेळी सुभाष पवार यांच्या गोटातील कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत — भाजपात गेल्यानंतर आपले स्थान काय राहणार? राजकीय जाणकारांच्या मते, सुभाष दादा पवार यांच्या प्रवेशाने आमदार किसन कथोरे यांच्या गोटाला मोठा धक्का बसू शकतो. मात्र, हा प्रवेश खरा की केवळ राजकीय दबावाचे प्रदर्शन, हे सध्या स्पष्ट नाही.
माजी आमदार गोटीरामजी पवार यांच्या राजकीय वारसावर उभे राहिलेले त्यांचे सुपुत्र सुभाष पवार सध्या कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीत, सुभाष पवारांचा भाजप प्रवेश हा मुरबाडच्या राजकारणातील नवा वादळ ठरण्याची पूर्ण शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या राजकीय समीकरणांचा रंग बदलणार, एवढे मात्र नक्की.
Post a Comment
0 Comments