शेतकऱ्यांच्या फळबागांचा मोहर करपला; मोठे आर्थिक नुकसान — पंचनामा करून भरपाईची मागणी
मुरबाड आण्णा साळवे
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील अनेक भागांमध्ये अचानक बदललेल्या हवामानामुळे फळबागांवरील मोहर करपल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अवेळी उष्णतेची लाट, कोरडे वारे आणि तापमानातील तीव्र चढउतार यामुळे आंबा, काजू व इतर फळपिकांच्या मोहरावर विपरीत परिणाम झाला असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
यंदा मोहर चांगला आल्याने उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांतील प्रतिकूल हवामानामुळे मोहर गळून पडणे, करपणे आणि फुलधारणा कमी होणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. परिणामी अपेक्षित उत्पन्नावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पीडित शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानीचे मूल्यांकन करून शासनाकडून भरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
“यंदा मोहर खूप चांगला आला होता म्हणून उत्पन्नाची मोठी अपेक्षा होती. पण अचानक आलेल्या उष्णतेमुळे सगळा मोहर करपून गेला. औषध, खत, मजुरी यावर आधीच मोठा खर्च झाला आहे. आता हातात काहीच राहिलं नाही. सरकारने तात्काळ पंचनामा करून आम्हाला भरपाई द्यावी, नाहीतर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल.”
शेतकरी एकनाथ देसले साजई
कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामानातील अस्थिरतेमुळे फळधारणेवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत त्वरित शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण होऊन मदत जाहीर होणे आवश्यक आहे. आता प्रशासन किती लवकर हालचाल करते आणि शेतकऱ्यांना दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments