Type Here to Get Search Results !

कथोरे - पवार एकत्र आल्याने मुरबाडच्या राजकारणाला नवी कलाटणी.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांची गोची.

कथोरे - पवार एकत्र आल्याने मुरबाडच्या राजकारणाला नवी कलाटणी.


जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांची गोची.


मुरबाड प्रतिनिधी आण्णा साळवे 


मुरबाड तालुक्यातील राजकारणाला पुन्हा एकदा अनपेक्षित वळण मिळाले असून विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले नेते आज पुन्हा एकत्र आले आहेत. आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात जोरदार लढत देणारे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांना पराभवाची धूळ चारत पुन्हा एकदा विकासाला मतदारांनी कौल दिला . मात्र काही दिवसानंतर सुभाष पवार  यांनी भाजपात प्रवेश केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा दोस्ती झाल्याचे चित्र  दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात कथोरे–पवार संघर्ष हा तालुक्यातील चर्चेचा विषय ठरला होता. दोन्ही बाजूंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणा देत वातावरण तापवले होते. मात्र आता राजकीय समीकरणे बदलल्याने कालपर्यंत विरोधात उभे असलेले नेते एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. त्यामुळे या नेत्यांसाठी झटणारे कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात पडले आहेत.
“कालपर्यंत विरोध, आज दोस्ती – मग निष्ठा कोणाच्या प्रति ठेवायची?” असा सवाल आता सर्वसामान्य मतदार विचारू लागले आहेत. अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना दिसून येत असून, जे काल सोडून गेले तेच पुन्हा एकत्र येतात, मग निष्ठावंतांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही जण तर “राजकारणाचे वाजले तीन तेरा” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय मैत्री अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही नेते एकत्र आल्याने पक्षातील इच्छुकांची संख्या वाढली असून तिकीट नेमके कोणाला मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणाऱ्या कार्यकर्त्यांची गोची झाल्याची चर्चा सुरू आहे.
राजकीय नेत्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे कार्यकर्ते आणि मतदारांनीही अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. व्यक्तीपेक्षा विचार आणि विकासाला प्राधान्य देण्याची वेळ आली असून, मतदार जागा झाला तरच राजकारणाला योग्य दिशा मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.

Post a Comment

0 Comments