देवदूत ठरला प्राथमिक शिक्षक – मृत्यूच्या दारातून बापलेकीला आणले परत.
(आण्णा साळवे मुरबाड )
ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा देवगाव (ता. मुरबाड) येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल अजंठा, वेरूळ आणि पैठण या ऐतिहासिक ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सहलीदरम्यान पैठण येथील प्रसिद्ध नाथसागर धरण परिसराला भेट देण्यात आली असता अचानक घडलेल्या एका थरारक प्रसंगात प्राथमिक शिक्षकाच्या धाडसामुळे बाप-लेकीचे प्राण वाचले आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
मुख्याध्यापिका दीपश्री इसामे, शिक्षक एकनाथ देसले, शिक्षिका प्रतिमा नागरगोजे व शिक्षिका श्रद्धा पाटील हे विद्यार्थ्यांना धरणाची माहिती देत असताना धरणाच्या काठावर संभाजीनगर येथील वाळुंज परिसरातील शहाणे कुटुंबातील एक व्यक्ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन पाणी दाखवत उभा होता. धरणाच्या काठावर शेवाळ धरलेल्या दगडावर अचानक त्याचा पाय घसरला आणि तो मुलीसह खोल पाण्यात कोसळला.क्षणात परिसरात एकच आरडाओरडा झाला. खोल पाण्यात बाप-लेकीचा जीव धोक्यात आला होता. अनेकजण भयभीत होऊन बघ्याची भूमिका घेत उभे होते. त्याचवेळी जिल्हा परिषद शाळा देवगावचे शिक्षक एकनाथ देसले यांनी प्रसंग ओळखत कुठलाही विचार न करता धरणाच्या काठाकडे धाव घेतली आणि स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्या व्यक्तीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. हात सटकल्याने ती व्यक्ती अजून खोल पाण्यात जाऊ लागली, तरीही देसले यांनी प्रयत्न सोडले नाहीत.
देसले यांनी पुन्हा पुढे झेप घेत प्रथम चिमुकलीचा हात पकडला आणि नंतर त्या व्यक्तीला आधार देत दोघांनाही सुरक्षित बाहेर खेचले. काही क्षणांपूर्वी मृत्यूच्या दारात उभे असलेले बाप-लेकी पुन्हा सुरक्षित जमिनीवर उभे राहिले आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
आपल्या मुलाला आणि नातीला नवजीवन मिळाल्याने त्या कुटुंबातील प्राथमिक शिक्षिका असलेल्या शहाणे आजींचे डोळे पाणावले. “तुम्ही आमच्यासाठी देव बनून आलात,” असे म्हणत त्यांनी शिक्षक एकनाथ देसले यांचे कृतज्ञतेने आभार मानले.
स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन निरपराध जीवांना वाचवणाऱ्या प्राथमिक शिक्षक एकनाथ देसले यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून, एका शिक्षकाने केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर समाजालाही मानवतेचा खरा धडा दिल्याची भावना व्यक्त होत आहे. 🙏
Post a Comment
0 Comments