Type Here to Get Search Results !

उपनगराध्यक्षा दिक्षीता वारे यांच्या विरोधात अविश्वास दाखल.


उपनगराध्यक्षा दिक्षीता वारे यांच्या विरोधात अविश्वास दाखल.

मुरबाड नगरपंचायतीत सत्तासंघर्ष पेटला.


मुरबाड | प्रतिनिधी आण्णा साळवे 

मुरबाड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. दिक्षीता भरत वारे यांच्या विरोधात नगरसेवकांनी थेट अविश्वास ठराव आणत विशेष सभा बोलावण्याची मागणी नगराध्यक्षांकडे केली असून नगरपंचायतीच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. या घडामोडीमुळे नगरपंचायतीत सत्तासंघर्ष उघडपणे समोर आला आहे.

दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरसेवक व नगरसेविकांनी नगराध्यक्षांकडे लेखी निवेदन देत महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ अंतर्गत उपनगराध्यक्षा सौ. दिक्षीता भरत वारे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी तात्काळ विशेष सभा बोलविण्याची मागणी केली आहे.


सदर निवेदनात उपनगराध्यक्षा दिक्षीता वारे या पदाची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार आणि नगरपंचायतीचे आर्थिक नुकसान झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना उपनगराध्यक्ष पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्षा सौ. दिक्षीता भरत वारे यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा करून थेट मतदान घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


दरम्यान, या अविश्वास ठरावामुळे मुरबाड नगरपंचायतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून सत्ताधारी गटातच फूट पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. नगराध्यक्ष विशेष सभा कधी बोलावतात आणि या अविश्वास ठरावाचे पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


उपनगराध्यक्षा वारे यांच्यावर आलेला हा अविश्वास ठराव मुरबाड नगरपंचायतीच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments